Thursday 19 November 2015

ओझे



ते नव्हते काही माझे
जे माझ्यासोबत होते
पाठीवर उपडे पडले
नात्यांचे भरले पोते. . .

मी मिरवित होते त्यांना
कुरवाळित बसले ऐसी
अश्वत्थामाच्या माथी
भळभळत्या जखमेजैसी. . .

जखमाच अता या केवळ
माझ्यासोबत उरलेल्या
देहाची राख उडाली
पण, आत्म्यातुन मुरलेल्या . . .

अंतरात सलती माझ्या
हुंदके लाख हृदयात
मी शिंपीत बसते अश्रु
तळमनात... अंधारात. . .

हे असले धुरकट जगणे
नुसते का धुमसत राही ?
जळतानाही सरणावार
कोडगेपणाने पाही. . .

पूजा भडांगे बेळगाव

Monday 21 September 2015

ओळ . . .

एक एक ओळ
येते पानावर 
जशी पोर नख-यात 
चाले भराभर. . . 

शब्दांच्यामधून 
अर्थ ती लावत 
गाली हात लाउनिया 
बसे विचारात. . . 

सुचता काहीसे 
लेखणी ती घेते 
मनाआतले ती मन 
लिहून काढते . . . 

कधी गीत होते 
कथाही सांगते 
ललितामधुन जग 
नवेसे मांडते. . . 

तिच्या कवितेला  
प्रतिभेचा मोह 
कधी गूढ जाणिवांचा 
अर्थगम्य डोह. . . 

अशी पोर ओळ 
जाणती होताना 
देखणी लेखणी वाटे 
शाई झरताना. . . 

ओळ अशी मला 
वाटते सुचावी 
पानावरून ती थेट 
काळजा भिडावी. . . 

पूजा भडांगे बेळगाव 



 

Friday 11 September 2015

चंद्र. . .


आभाळाच्या ओठांवरती
सांजधुनीची केशर गाणी
आणिक क्षितिजाच्या भिवईवर
चांदणरेषा लोभसवाणी...

लोभसवाणी त्याहून असते
चंद्रावर आरास रुप्याची
पूर्ण पौर्णिमा अजून बाकी
तरी मोहिनी कलेकलेची...

कलेकलेसम रोज उजळतो
चांद देखणा झाडामागून
तीट काजळी अंधाराची
सभोवताली घेतो लावून...

घेतो लावून सवय उगाचच
रात्र रात्रभर जागायाची
आणिक नक्षत्रांच्या गावी
अवघड वळणे मागायाची...

मागायाच्या त्यालादेखील
लाख तारका रोज रोज पण,
त्यांच्याहीपाशी स्वप्नांची
पखरण करते हळवेसे मन...

हळवेसे मन चंद्रामागून
फिरते, झुरते.. तळमळतेही
कुणा प्रियाच्या आठवातुनी
भरल्या डोळ्यांतून गळतेही...

गळणा-या चांदणपाण्यातुन
रात्र होतसे शुभ्र नितळशी
शुक्ल, क्रुष्ण मग रोजच होतो
चंद्र नांदता या डोळ्यांशी...


पूजा भडांगे बेळगाव


Thursday 10 September 2015

शाळेची वाट....



आणि मग माझं नाव मोठ्या शाळेत टाकलं. तशी मी आधीपासूनच (अति) हुषार.. ;-) दोन वर्ष बस्तीतल्या बालवाडीत न रडता जायचे. सगळी गाणी म्हणायचे पण एकदाच कुठल्याकी पोरानं माझी पेन्सिल खाल्ली म्हणून त्याच्या पाठीत दणका दिलेला, तेवढीच काय ती तक्रार.. ! पण, तरीही बे चे पाढे तीसपर्यँत पाठ म्हणून मला मोठ्या मुलींच्याच शाळेत घालायचा निर्णय घरात एकमतानं घेतला. मुलींच्याच.. कारण, तिथं आणि कुणी माझी पेन्सिल खाल्ली तर समोरून पडणारा उलटा मार मला झेपणारा असेल.. निव्वळ या काळजीपोटी..! पण, सुदैवाने पुढे कुणी माझी पेन्सिल खाल्ली नाही. त्यामूळे ती चिंताच मिटली..
तर महिला विद्यालय सारख्या मोठ्या शाळेत आपण शिकणार याचा आनंद तर होताच पण आमच्या इकडे २९ मे म्हणजे २९ मे लाच शाळा सुरू होतात.. त्यामुळे "तुझा वाढदिवस असतो ना म्हणून आजपासून शाळा सुरू होतात" असं कुणीतरी सांगितलेलं म्हणून मी अजून जरा हवेत होते.
आमची नुसती मुलींची शाळा.. एकपण पोरगा नाही.. शिकवायला पण नाही.., सगळ्याच लेडीज टीचर, निळा फ्रॉक आणि शाळेच्या अंगणात प्राजक्ताचं झाडं.. पहिल्यांदा शाळेचा हा अनुभव घेतला तेंव्हा शाळेत सोडायला आजोबा आलेले.. त्यानंतरही रोज यायचे.. वर्षभर.. कारण, घरापासून शाळा खूपशी लांब नसली तरी महिला विद्यालय गाठायला कॉलेज रोड चा भला मोठा ट्राफिक ओलांडून जावं लागायचं, तशी शाळेच्या पहिल्या दिवसाची खास अशी आठवण आठवत नाही, कारण मी अतिहुषार असले तरी कमालीची विसर"भोळी" आहे म्हणून.. :-P
असो,
पण, शाळेला जाताना बोगारवेसेतल्या म्हणजे धर्मवीर संभाजी चौकातल्या घड्याळाला वळसा घालून कॉलेज रोडमार्गे शाळेकडे जाणारी एक आठवण मात्र ठळक आठवते.. तेंव्हा मी वयाने लहान तरी माझ्या चालण्यातली गती वेगवान होती.. पण माझ्या आजोंबांच्या वाढत्या वयाच्या थकव्यामुळे त्यांची गती जरा हळूच होती.. थांबून थांबून चालायचे. अर्धा पाऊण तास तरी लागायचाच शाळेत पोहोचायला... (आता मी १५ मिनीटात शाळा गाठते ही गोष्ट निराळी..)

तर तो हायवे रोड असल्याने लोकांना ये-जा करण्यासाठी सगळा फुटपाथ तांबड्या टाईल्सनी बनवलेला होता. रोज एवढं चालायची सवय नसल्यानं सुरूवातीला फार फार दमायला व्हायचं. इतकं की पाण्याची बाटली वाटेतंच रिकामीच व्हायची.. मग माझं गाणं चालू..
"बाबा, मला उचलून घ्या.."
आजोबा स्पष्ट म्हणाले.
"उचलून घेतो, पण शाळेत नेणार नाही.. फिरवून आणतो तुला मिलेट्री महादेवला" माझा मूड गेला.
मला फिरणं नको होतं पण आता चालणंही होईना.. मोठ्या शाळेत शिकायची भारी हौस ना आणि आजोबांचे शब्दही कानावर होतेच..
छोट्या छोट्या चौकोनी टाईल्स तुडवत जाताना पाढे म्हणायचीही सवय त्यांनीच घालून दिली. त्यामुळे २८व्या पाढ्याला कधी शाळेचं गेट यायचं कळायचंच नाही.
या सगळ्यातूनही "तुला तुझी वाट दाखवलीय.. वेळ लागेल, दमही लागेल पण तुझी वाट तुझी तुलाच चालत जावी लागेल.." असं काहीतरी ते तेव्हा मला न बोलता, न दुखावता बोलून गेलेले.. आताही शाळा म्हटली की हे सगळं आठवतंच आणि आजही शाळेच्या वाटेने जाताना हे शब्द कानावर येतातच...

पूजा भडांगे बेळगाव 


"दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . . "


केशर शिंपीत हलक्याने आभाळी कातरवेळ सजावी. . . 
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
हळू हळू सूर्याने जावे क्षितिजाच्याही खाली खाली
आणिक त्याचे रंग लालसर पसरावे सा-या भवताली
या रंगांच्या सोहळ्यातुनी रम्य कोवळी वेळ फुलावी. . .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
झाडांच्या पानातून भिनतो मत्त सुगंधित धुंद गारवा
शीळ वाजवित मंजुळ घरट्याकडे परत येताच पारवा
याच क्षणाला अपुल्या ओठांवरती आठव-गाणी यावी
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
तांबुसल्या मातीची ओंजळ भरता कातरश्या मायेने
समजुन घ्यावे सांजपाहुणी आली शकुनाच्या पायाने
तिच्या स्वागताला तुकयाची एक छानशी ओवी गावी. . .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
प्रत्येकासाठीच खास असतोच प्रहर हा रोज रोज पण,
प्रत्येकाने कुठेतरी अनुभवले असतील असे खुळे क्षण
याच क्षणाला आठव-वेडी आनंदी पाने चाळावी. . .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
कुठे जपाची माळ थरथरे कातर हाती शामलवेळी
कुणी परवचा म्हणते आणिक कुण्या घरी भजनाच्या ओळी
देव्हा-यातुन मंद दिव्याची त्या समयी समई लागावी. .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .

Wednesday 9 September 2015

बयो...


हसत रहा, हसत रहा.. सारखी सारखी हसत रहा..! रडू वाटलं तर रड, पण चारचौघात नको. आधी चुकतं, मग खुपतं मग नुसतं नुसतं दुखत राहतं, पण ते सारं तात्पुरतंच..! काळ जावा लागतो फक्त, कुठल्याही गोष्टीसाठी... मग दुखणंही विस्मरणात जातं हळूहळू.. 
स्वतःच्या आत बघ.. एक मोठ्ठी दरी आहे त्यात. खोल.. अगदी आतवर गेलेली.. तीच्यात फेकून दे नको असलेलं. दुखणं-खुपणं, राग-भिती सगळं वाईट-साइट. गालांचा फुगा फार काळासाठी नको मिरवूस. हसणं वाहू दे खळखळून तुझ्या बोलक्या डोळ्यातून.. कारण तुझी मायेची एक नजर माझ्या कितीतरी जखमांचं औषध असते. तू नुसती हसलीस ना तरी सगळं जग सुंदर दिसायला लागतं.. अगदी तुझ्यासारखं.. प्रेमाची अनुभूती जशी तुझ्या प्रत्येक शब्दातून येते ना तशीच तुझ्या प्रसन्न चेह-याकडे नुसतं बघितल्यानेही येते गं.. 
तू तुझ्या असण्याहूनही जास्त खूप काहीतरी आहेस. .  कुणासाठी तरीतरी. . तुझं तू पण विसरून जा आणि मला सामावून घे तुझ्या विश्वात. . 
बयो. . ऐकतेय्सं ना गं..?? तू प्रेमाचं ते हसरं गाव आहेस ज्या गावाच्या चौकाचौकात आनंद भरली ओंजळ घेऊन प्रेम उभंय... 
ते प्रेम जे तू मला दिलंस.. ते प्रेम जे मीही कुणालातरी देईन.. ते प्रेम जे नुसतं पसरत राहील..!
म्हणून तूही हसत रहा, मीही हसत राहीन..!

तू मला दिलेल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणाचा सोहळा करायला रोजचाच प्रेमदिन होवो...!


-पूजा भडांगे बेळगाव 

जोडव्यांची सल. . .


चुलीतला जाळ जरा जास्तच लख्ख होत होता.. इतका की लाल-भगव्या ठिणगीतून मला प्राजक्ताची देठं उडाल्याचा भास होऊ लागला..
हल्ली हे असंच होतं.. नाजूक साजूक असं काही दिसतंच नाही डोळ्यांना..
दिसत नाही की, माझ्या आयुष्यात आता नाजूक म्हणावं असं काही राहीलंच नाही.. माहीत नाही पण, विळीवर धरलेल्या कांद्यासारखं सोलपटून निघायला होतं क्षणोक्षणी... पापणकाठ भरून वाहत राहतो सारखा..

चुलीपुढ्यात बसून पायातल्या  जोडवीची रिकामी झालेली जागा कुरवाळत असताना तू डोळ्यात दाटून येतोस... आगीत एकेक सरपण ढकलावं तसं जळत राहत मनातलं काही.. 
उर भरुन निघालेला एकेक आवंढा विस्तवाच्या धगीने आतल्या आत गुदमरून असतो... पण, फुटत कधीच नाही..

पाण्याच्या निमित्ताने स्वयंपाक घराशी घुटमळणारी तुझी आडदांड छबी उगीच ये-जा करत राहते मग..!
एव्हाना भांड्यातला भात रटरटून वर झाकलेली ताटली फडफडत असतानाच माझी तंद्री तुटणार तोच बाहेर घुंगराची माळ तोडत गेल्यासारखी बैलजोडी दारावरुन ऐटीत धावत जाते.. मी पुन्हा कासाविस... अगतिक.. सैरभैर.. घरटं अकस्मात तुटून पडलेल्या हताश चिमणीसारखी..!

उगीच भास होतो नसलेल्या गोष्टींचा.. श्वासातला उष्मा पेटून उठतो आणि मनातली अस्वस्थता पुन्हा उंब-यात कैद होते...

तू यायची हीच वेळ होती ना...!
दमल्या शरिराने घरात शिरणारा तुझा रुबाब संध्याकाळी घराला कसं घरपण द्यायचा. ओसरीवर वाजलेली पावलं आत शिरायच्या आत पाण्याने भरलेला तांब्या तुझ्यापुढ्यात हजर करत असताना माझा "तू" मला भेटायचास..
चारचौघात अदबीनं, मानानं हाक मार पण, एकांतात "तू" अशी हाक मार असं तूच सांगितलंस ना रे...! डोक्यावरच्या पदराआडून भांगेत भरलेलं कुंकू न्याहाळणारा तू आताशा भेटतंच नाहीस या वेळेला..

मी तो पाण्याचा तांब्या आजही न चुकता भरून ठेवते.. फणेरीपेटीतली कुंकवाची डबीही भरलेलीच असते माझ्या चिमुटभर स्पर्शाशिवाय...

तू जाताना तुझ्या आठवणी किती भरजरी करुन गेलास.. अगदी ह्या उतरवून ठेवलेल्या सगळ्या गडद रंगांसारख्या..
ज्यांना मी डोळाभर पाहूही शकत नाही आणि स्पर्शही करू शकत नाही..!

तूला "तू" म्हटलेलं आवडत म्हणून जन्मात न संपणारा एकांत माझ्या पदराला बांधून गेलास ना..?


पूजा भडांगे बेळगाव